कृष्णा- कोयना... सख्या बहिणी.....
कृष्णा- कोयना... सख्या बहिणी.
उत्तरेहुन वाहत येणारी कृष्णा व दक्षिणेहुन येणारी कोयना दोघी अगदी आमने सामने येवून एकमेकिँना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पुर्वेला वाहत जातात. असे काटकोनात वाहने सहसा नद्यांच्या स्वभावात नाही. पण कराडचा प्रितीसंगम मात्र त्याला अपवाद.
तसे म्हंटले तर कृष्णा व कोयना सख्या बहिणीच...
महाबळेश्वर हे या दोघीँचे उगमस्थान. पण दोघींमध्ये केवढा फरक, थोरली बहिण कृष्णा समसूतदारपणे वगणारी. ही लहान मुलीसारखी डोँगर- दर्याँमध्ये जास्त खेळत बसत नाही. हिला घाई असते ती घाटांवर यायची, तहानलेल्या पिकांना पाणि पाजून ताजे तवाने करण्याची.
तर धाकटी बहीण कोयना म्हणजे खुप खोडकर...
डोँगरांमध्ये खेळणे हिला फार आवडते. हिचे सगळे मित्र पण असेच रांगडे... प्रतापगड, मकरंदगड, वासोटा आणि जावळीचे खोरे म्हणजे यांचे आंगण, पण धाकटी असली तरी आंगात जोर फार...
पूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवते. तर अश्या या दोघी. अगदी भिन्न स्वभावाच्या पण सख्या बहिणी.
जबाबदारीने वागणारी कृष्णा तर खोडकर कोयना.
उस शेती पिकवणारी कृष्णा, तर भात पिकवणारी कोयना.
वाईच्या गणपतीचे पाय धुणारी कृष्णा, तर प्रतापगडच्या भवानी मातेला नमन करणारी कोयना.
पण कराडला आलेवर दोघीँचाही ऊर दाटून येतो आणि धावत येवून दोघी एकमेकांना अलिँगन देतात.
या प्रितीसंगमाच्या पण दोन वेगवेगळ्या छटा आहेत. उन्हाळ्यात व हिवाळ्यात यांचे शांत व कोमल रुप दिसते. तर पावसाळ्यात याचे रौद्र रुप दिसते.
Comments
Post a Comment