महाराष्ट्रात मुसळधार पाऊस,कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ..‘अलमट्टी’ तून अडीच लाख क्यूसेक विसर्ग
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस,
कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ..
‘अलमट्टी’ तून अडीच लाख क्यूसेक विसर्ग
August 17, 202004
धरण क्षेत्रासह जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यास सांगितले. त्यानुसार सोमवारी अडीच लाख विसर्ग सुरू ठेवण्यात आला.
दरवर्षीचा अनुभव पाहता शिरोळ तालुक्यातील अनेक गावे पुराच्या वेढ्यात सापडतात. यावेळीही संततधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे दक्षता घेत मंत्री यड्रावकार यांनी बेळगावचे पालकमंत्री जारकीहोळी यांच्याशी चर्चा करून अलमट्टीतून विसर्ग वाढविण्याची विनंती केली. त्यानुसार दोन लाख क्यूसेक वरून अडीच लाख क्यूसेक विसर्ग वाढविण्यात आला.
दरम्यान, मंत्री यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी, तेरवाड बंधारा, राजापूर बंधारा येथे भेट देऊन पुरस्थितीची पाहणी केली. राजापूर बंधारा येथून एक लाख २७ हजार ५०० क्यूसेक विसर्ग ठेवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. त्यानुसार विसर्ग सुरू ठेवण्यात आला. या बंधाऱ्यावर सोमवारी दुपारी पाणी पातळी ४३ फुटावर स्थिर राहिली. येथील इशारा पातळी ५३ फूट तर ५८ फूट इतकी आहे.
शरद कारखान्याकडून यांत्रिक बोट
पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व साखर कारखान्यांनी बोटी घ्याव्यात असे शासन व प्रशासन पातळीवर धोरण ठरले आहे. त्यानुसार शरद साखर कारखाण्याकडून एक यांत्रिक बोट खरेदी करण्यात आली आहे. तिचा वापर आपत्ती व्यवस्थापन कामासाठी केला जाईल, असे यड्रावकर यांनी सांगितले.
ग्रामसेवक तलाठ्यांना गावातच थांबण्याचे आदेश
सद्यस्थितीत शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती नियंत्रणात आहे. तरीही संततधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे दक्षता घेत ग्रामसेवक व तलाठी यांना गावातच थांबण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेतातील लोकांचे व पशुधनाचे गावात स्थलांतर करण्याचे निर्देश दिले असून त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील व कर्नाटकाचे पाटबंधारे मंत्री जारकीहोळी या दोघांमध्ये चांगला समन्वय आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग चांगल्या पद्धतीने सुरू आहे, असे मंत्री यड्रावकर यांनी सांगितले
Comments
Post a Comment